Pune News : पुण्यातील जनतेसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विकसित होत असून मेट्रो सोबतच रस्ते विकासाची प्रकल्प देखील मार्गी लागत आहेत. दरम्यान आता महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे आहे.
एवढेच नाही तर या मेट्रो मार्गासोबतच पुणे शहराला एका नव्या दुमजली उड्डाणपुलाची देखील भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा दुमजली उड्डाणपूल महा मेट्रो कडून विकसित केला जाणार आहे.

पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत हा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार असून, याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर सुद्धा केला आहे. अर्थातच आता या उड्डाण पुलाचे काम येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
पण या पुलासाठी 85 कोटींचा खर्च अपेक्षित असून याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला सादर झाला असल्याने महापालिका या उड्डाणपुलाच्या कामासाठी मान्यता देणार का हे पाहण उत्सुकतेचे राहणार आहे.
मात्र जर हा उड्डाणपूल पूर्ण झाला तर कोथरूड डेपो परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. खरेतर, शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारापैकी एक असलेल्या पौड रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
यामुळे या भागात अपघातांची भीती देखील असते. पुणे-मुंबई महामार्गाशी जवळीक असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.
लोहिया आयटी पार्क ते कचरा डेपोपर्यंत तीन सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने या दिड किलोमीटरच्या अंतरावर सतत वाहतूक कोंडी होते.
म्हणूनच या भागात उड्डाणपूल विकसित झाला पाहिजे अशी मागणी होती. पालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते, मात्र महामेट्रोने वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासह उड्डाणपूलाचा प्रस्ताव दिला आहे.
नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या धर्तीवर कोथरूड डेपोसमोर हा पूल उभारला जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे कोथरूड डेपो समोरील वाहतुक कोंडीची समस्या कायमची दूर होईल आणि या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे.