Pune News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईहून पुण्याकडील प्रवासात आणखी वेगवान होणार आहे. आता पुणे आणि मुंबईदरम्यानचा प्रवास आणखी वेगवान आणि सुरळीत व्हावा यासाठी एका नव्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जेएनपीटी (पागोटे) बंदर ते जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे उभारण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर तयार केला जाणार आहे.

हा प्रकल्प तब्बल २,९०० कोटी रुपये खर्चाचा असून, तो खास बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर राबवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला.
एकूण ४,५००.६२ कोटी रुपयांच्या खर्चात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रकल्पाची एकूण लांबी २९.२१९ किमी असून, तो जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा एक महत्वाचा दुवा ठरेल.
या नव्या एक्स्प्रेसवेमुळे मुंबई–पुणे प्रवासासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेष म्हणजे, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना फक्त १० मिनिटांत मुंबई–पुणे महामार्ग गाठता येणार आहे.
वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी या मार्गावर २ मोठे बोगदे, ६ मोठे पूल, ५ छोटे पूल, ४ उड्डाणपूल आणि २ रस्ते पूल उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, बांधकामाचा कालावधी ३० महिने निश्चित करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पामुळे केवळ मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक गर्दी कमी होणार नाही, तर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्ही अधिक गतिमान होईल. रायगड, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नागरिक, तसेच उद्योगधंद्यांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे.
या भागात अनेक औद्योगिक आणि निवासी प्रकल्प उभे राहत असल्याने, हा नवीन एक्स्प्रेसवे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना देईल. सरकारच्या मते, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक नवे पर्व सुरू होणार आहे.













