पुण्यातील गणेश भक्तांसाठी खुशखबर ! २००० हजार रुपयांच्या खर्चात अष्टविनायक यात्रा, एसटी महामंडळाची नवीन योजना

Pune News : पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल आणि अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एसटी महामंडळाकडून एक विशेष टूर पॅकेज ऑफर केले जाणार आहे.

यामुळे तुम्हाला कमी खर्चात अष्टविनायकाचे दर्शन शक्य होईल. खरेतर सध्या अनेक भाविक अष्टविनायकाच्या दर्शनाचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान अष्टविनायक दर्शनाची इच्छा असणाऱ्या याच भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष यात्रा जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान एसटीचा हा विशेष टूर गणेशभक्तांसाठी फारच फायद्याचा राहणार आहे.

ही यात्रा भक्ति, श्रद्धा आणि समाधानाचा अनोखा अनुभव देणारी ठरणार असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण एसटी महामंडळाकडून सुरू केल्या जाणाऱ्या या यात्रेचे वेळापत्रक कसे राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कस असणार वेळापत्रक?

ही विशेष बस सेवा जानेवारी २०२६ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. ही अष्टविनायक दर्शन यात्रा शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड आगारातून सुरू होणार आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक यात्रा अंतर्गत विशेष बस सोडली जाणार आहे.

या विशेष बसेसच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही बस सोमवारी सकाळी सात वाजता प्रवासाला सुरुवात करणार आहे. या बसेसमधून भाविकांना आठही अष्टविनायक गणेश मंदिरांचे दर्शन नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणले जाणार आहे.

प्रवासादरम्यान राहण्याची आणि निवासाची व्यवस्था भक्तिनिवासामध्ये करण्यात येणार असून सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत दर्शन मिळावे यावर खास भर देण्यात आला आहे. या यात्रेसाठी तिकीटदरही परवडणारे ठेवण्यात आले आहेत.

या बसेसचे तिकीट दर सुद्धा दोन हजार रुपयांच्या आताच आहे. या बसेस मध्ये प्रवास करण्यासाठी प्रौढ प्रवाशांना ११४२ ते ११६२ रुपये इतके तिकीट लागेल. तसेच लहान मुलांसाठी तिकीट दर ५७४ ते ५८४ रुपये इतके राहणार आहे.

प्रवास, निवास आणि दर्शनाची सुविधा या दरात उपलब्ध होणार असून भोजनाचा खर्च मात्र प्रवाशांनी स्वतः करायचा आहे, हे विशेष. गर्दी टाळण्यासाठी एसटी महामंडळानं ऑनलाईन आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

अधिकृत संकेतस्थळावर तसेच एमएसआरटीसीच्या मोबाईल अॅपवरून तिकीट आरक्षण करता येईल. ऑनलाईन सुविधा शक्य नसलेल्या प्रवाशांसाठी अधिकृत खासगी तिकीट केंद्रांवरही आरक्षणाची सोय उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे, ४० किंवा त्याहून अधिक प्रवाशांचा गट असल्यास त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे एकत्र प्रवास करण्याचा आनंदही भाविकांना घेता येणार आहे.

कमी खर्चात, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची ही उत्तम संधी असून भक्तांनी या विशेष यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.