Pune News : पुण्याला येत्या भविष्यात दोन रिंग रोड प्रकल्पाची भेट मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) दोन रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान यातील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. जमिनीच्या भूसंपादनानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली असून येत्या काळात हा रिंग रोड नजरेस पडायला सुरवात होणार आहे.

दरम्यान आता शहरातील दुसऱ्या रिंग रोड प्रकल्पाबाबत ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या बहुप्रतिक्षित पुणे इनर रिंग रोड प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या ८३.१२ किलोमीटर लांबीच्या रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक जमीन भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. खरे तर हा रिंग रोड सात टप्प्यांत विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाढत्या वाहतूकीचा ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे.
दरम्यान सद्यस्थितीला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच इतर ६ टप्प्यांसाठी प्राथमिक सर्वेक्षण आणि आराखडे तयार करण्याचे काम पण युद्ध पातळीवर सुरू आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि उपनगरी भागातील जमीन लागणार आहे. या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संबंधित जमीन मालकांसोबत सातत्याने चर्चा केली जात आहे.
रिंग रोडचे टप्पे कसे आहेत
टप्पा १: सोलू ते वडगाव शिंदे (१०.४ किमी),
टप्पा २: नगर रोड ते सोलापूर रोड (१२.२९ किमी),
टप्पा ३: सोलापूर रोड ते सासवड रोड (६.१४ किमी),
टप्पा ४: सासवड रोड ते सातारा रोड (१४.५७ किमी),
टप्पा ५: सातारा रोड ते पौड रोड (१२.४ किमी),
टप्पा ६: पौड रोड ते महालुंगे-नांदे रोड (१०.५५ किमी),
आणि टप्पा ७: महालुंगे-नांदे रोड ते परंदवडी इंटरचेंज (१६.७७ किमी).
पण, ८३ किलोमीटरच्या रिंग रोडचे काम सात टप्प्यांत विभागल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठीपूर्ण होण्यासाठी बरीच वर्ष वाट पाहावी लागू शकते. तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या या प्रकल्पाचे काम जसे सुरू आहे त्याच गतीने पुढे पण सुरू राहिले तर हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन-अडीच दशकांचा वेळ लागेल.
या प्रकल्पात निधी उभारणी करताना आणि जमिनीचे भूसंपादन करताना सुद्धा प्रचंड आव्हानांचा सामना पीएमआरडीएला करावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य नेमके काय असणार, हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.