Pune News : काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. काल अर्थातच 27 फेब्रुवारी 2024 ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे.
यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत.
यात त्यांनी सांस्कृतिक राजधानी पुण्यासाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात वित्तमंत्री अजित पवार यांनी पुण्यात उपराजधानी नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) धर्तीवर एम्सची उभारणी करणार अशी मोठी घोषणा केली आहे.
यामुळे आता पुण्याला देखील एम्स मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान याबाबतचा सविस्तर प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार असून हा सदर प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
राज्य सरकारकडून पुण्यात एम्स उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार होईल आणि हा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तत्सम प्रस्ताव तयार होणार अशा चर्चा आहेत.
कुठं उभ राहणार पुण्यातील एम्स ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध येथे हे एम्स तयार होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमूद करू इच्छितो की, राज्याच्या आरोग्य विभागाकडे पुण्यातील औंध येथे 85 एकर जागा उपलब्ध आहे.
ही जागा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहे. दरम्यान औंध येथील याच जागेवर एम्सची उभारणी होणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
पुण्यात एम्स तयार होणार याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याने भविष्यात पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.
यामुळे आता याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून केव्हा तयार होईल आणि या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून केव्हा मंजुरी मिळणार याकडे पुणेकरांचे विशेष लक्ष राहणार आहे.