Pune News : वाहतुकीच्या समस्येने त्रस्त नागरिकांसाठी एक दिलासादायी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुकीला चालना दिली जात आहे.
नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता पुणेकरांचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुण्यात लवकरच डबल डेकर बस धावणार आहे.

पुणे महापालिकेच्या ताफ्यात डबल डेकर बस दाखल झालीये. या बसेस इलेक्ट्रिक आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) या गाड्यांची चाचणी सुद्धा सुरू केली आहे.
स्विच मोबिलिटी कंपनीने तयार केलेल्या ह्या बसेस आधुनिक, पूर्णपणे वातानुकूलित (एसी) आहेत. या गाडीत 60 प्रवाशांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध आहे तर 25 प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील.
या डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसची लांबी 9.5 मीटर, रुंदी 2.6 मीटर व उंची 4.75 मीटर आहे. ही बस शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहे. आरामदायी आणि वेगवागन प्रवासासाठी ही गाडी डिझाईन करण्यात आलीये.
या बसची किंमत जवळपास दोन कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात अशा दहा बसेस पुणे महापालिकेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
या बसेसची चाचणी नुकतीच सुरू झाली असून पुढील काही दिवस चाचणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. साधारणता पुढील आठ-दहा दिवस चाचणी सुरू राहील आणि त्यानंतर मग ही बस सर्वसामान्यांसाठी चालवली जाणार आहे.
ही गाडी हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा अशा भागांमध्ये सुरू करण्याची महापालिकेची योजना असल्याची बातमी समोर येत आहे. नक्कीच या भागात डबल डेकर बस सुरू झाली तर पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.