2026 च्या सुरुवातीला पुणेकरांना मिळणार खास गिफ्ट ! शहरातील ‘या’ महत्त्वपूर्ण मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस

Pune News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी 2026 मध्ये एक नवीन बस सुरु केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएमपी अर्थातच पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

पीएमपीकडून येत्या नव्या वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर नवीन डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जाणार आहेत. याबाबतची नवीनतम अपडेट अशी आहे की 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा अंतिम निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

आता यासाठी निविदा प्रक्रिया पण सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख आणि गर्दीच्या मार्गांवर डबल डेकर बस धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डबल डेकर इलेक्ट्रिक बसची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते आणि अखेरकार आता या बसेस प्रत्यक्षात पुणेकरांसाठी चालवल्या जाणार आहेत.

पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच या बस खरेदीस मान्यता दिली होती. त्यानंतर या बसेस कुठे चालवायच्या याबाबत प्रात्यक्षिक चाचणी सुद्धा झाली होती. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर यांसारख्या प्रमुख भागांतील रस्त्यांवर दहा दिवसांची प्रात्यक्षिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.

म्हणजेच इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस या प्रमुख भागात सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान, या चाचणीदरम्यान बसची कामगिरी, प्रवासी क्षमता, वळणक्षमता तसेच इलेक्ट्रिक बॅटरीची कार्यक्षमता तपासण्यात आली. बॅटरी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती.

समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर अखेर 25 ई-डबल डेकर बस घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. डबल डेकर बसमुळे एका फेरीत जास्त प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे. प्रत्येक बसमध्ये 60 प्रवासी बसून आणि 25 प्रवासी उभे राहून प्रवास करतील.

म्हणजेच एका बसेसची प्रवासी क्षमता 85 इतकी राहणार आहे. या बसेस संपूर्ण वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त असतील. या बस शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यास सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत. खरे तर मुंबईत आधीच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस सुरू आहेत आणि यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

दरम्यान राजधानी मुंबईच्या धरतीवर आता सांस्कृतिक राजधानीत सुद्धा डबल डेकर बसेस सुरू होणार आहेत. आता आपण पुण्यातील कोणत्या व्यस्त मार्गांवर ही बस सेवा सुरू होणार याची माहिती पाहूयात. 

या मार्गांवर धावणार बसेस 

प्राथमिक टप्प्यात हिंजवडी फेज 3 वर्तुळ मार्ग, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी आणि चिंचवड ते हिंजवडी या मार्गांवर इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस चालवल्या जातील.

या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार मार्गांमध्ये बदल किंवा वाढ केली जाणार अशी पण माहिती यावेळी देण्यात आली आहे. या बसेसच्या किमती बाबत बोलायचं झालं तर एका इलेक्ट्रिक डबल डेकर ची बस जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. मात्र पीएमपी कडून या बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.