Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. रिंग रोड मुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी नियंत्रणात येईल अशी आशा आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा डेव्हलप केले जात आहे.
खरे तर पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्पांची कामे मार्गी लागली आहेत. पुणे शहराचा आणि आजूबाजूला वसलेल्या उपनगरांचा झपाट्याने विकास होत असल्याने विविध विकासाच्या प्रकल्पांची कामे शासनाकडून आणि प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आलीत अन अजूनही अनेक प्रकल्प प्रस्तावित होणार आहेत.

दरम्यान, रिंग रोड आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये जमिनीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे तसेच जमिनीचा भाव देखील खूपच वाढलाय. नव आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये होणार आहे तसेच रिंग रोड पुरंदर तालुक्यातून जाणार आहे अन म्हणून या प्रकल्पामुळे पुरंदर तालुक्यातील जमिनींना अक्षरशः सोन्याचा भाव येतोय.
आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत आधी संभ्रमावस्था होती मात्र हे विमानतळ पुरंदर मध्येच होणार हे फिक्स झाल्यानंतर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये जेवढे जमीन खरेदीचे व्यवहार झालेत तेवढे व्यवहार तर त्यामागील बारा महिन्यांमध्ये सुद्धा झाले नव्हते. तसेच जमिनीचे भाव सुद्धा ऐतिहासिक उंचीवर गेले आहेत अन यामुळे जमीन मालक प्रचंड खुश आहेत.
या गावांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत दहा मार्च 2025 रोजी शासनाच्या माध्यमातून एक नवीन अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचनेनंतर विमानतळ कोणत्या गावांमध्ये होणार हे स्पष्ट झाले आणि त्यानुसार संबंधित गावांमध्ये जमिनीचे व्यवहार वाढलेत.
तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी व पारगावसारख्या गावांमध्ये जमिनीचे व्यवहार फारच वाढलेत. गेल्या तीन महिन्यांत या संबंधित गावांमध्ये खरेदीखतांची संख्या दुपटीने वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.
विमानतळाच्या अधिसूचनेनंतर या भागातील जमीन व्यवहारात नवचैतन्य निर्माण झाले आहे अन यामुळे सर्वच जण व्यस्त आहेत. पुरंदर तालुक्यातून रिंग रोड सुद्धा जाणार आहे हा रिंग रोड तालुक्यातील दिवे, चांबळी, सोनोरी गराडे यासह अन्य काही गावांमधून जाणार असून या गावांमधील आवश्यक जमिनीसाठी बहुतांश भूसंपादन पूर्ण सुद्धा झाले आहे.
दरम्यान या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी रिंगरोडसाठी संपादित झालेल्या जमिनींना पाचपट दर मिळाला आहे. यामुळे संबंधित बाधित शेतकरीही समाधानी झाले आहेत. या प्रकल्पासाठी सुरुवातीला विरोध करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आता चांगला दर मिळाला असल्याने जमिनीचे व्यवहार सुरू केले आहे.
तसेच, काही जणांनी इतरत्र जमीन घेऊन व्यवस्थापन केल्याचे परिसरातील चित्र आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दलाल व गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पण जमीन मालकांनी सुद्धा चांगला दर मिळाला तरच विक्री ही मानसिकता दाखवली आहे.
जमिनीचे प्लॉटिंग पूर्ण
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांमुळे पुरंदर तालुक्यातील संबंधित सात गावांमध्ये व या गावांच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी प्लॉटिंग पूर्ण झाली आहे. मोठ्या व्यवसायिकांनी प्लॉट पाडून याची विक्री सुरू केली आहे.
या परिसरात एक गुंठ्यांपासून ते 11 गुंठे जमिनीचे प्लॉट तयार करण्यात आले आहेत आणि याच्या विक्रीसाठी ऑफर देखील सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यावर प्लॉटिंग करण्यात आली आहे. या भागातील शंभर एकराराहून अधिक जमिनीवर प्लॉटिंग झाली असावी असा अंदाज आहे.
या गावांमधील जमिनीला सोन्याचा भाव
पुरंदर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प अन रिंग रोड प्रकल्पामुळे तालुक्यातील रिसे, टेकवडे, पिसे, नायगाव, भिवरी, गराडे, बोपगाव, कोडीत खुर्द-बुद्रुक या गावांमध्ये जमिनीची मागणी झपाट्याने वाढली आहे. या भागात पुणे व मुंबईतील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीत रस दाखवत असल्याचे चित्र आहे.
हेच कारण आहे की या भागात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून, पुरंदर तालुका सध्या गुंतवणुकीचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे, असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती ठरणार नाही. नव आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात विकासाची नवी गंगा घेऊन येणार आहे.