Pune News : पुणेकरांसाठी एक अगदीचं दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराला आणखी काही नव्या मेट्रो मार्गांची भेट मिळणार आहे. यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत येणाऱ्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिकांना अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन्ही मेट्रो प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे. या दोन्ही उपमार्गिकांमुळे पूर्व पुणे आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
दोन्ही प्रकल्पांची एकत्रित लांबी सुमारे 16 किलोमीटर असून, या मार्गांवर एकूण 14 उन्नत मेट्रो स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल ₹5,704 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या दोन्ही मार्गिकांची अंमलबजावणी ‘महा मेट्रो’ मार्फत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “हडपसर-लोणी काळभोर आणि सासवड रोड उपमार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारेल.
हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड आणि आसपासच्या ग्रामीण भागाला थेट मेट्रो जोडणी मिळेल. लाखो प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि किफायतशीर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल.” मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहनवाढीमुळे वाढणाऱ्या प्रदूषणात घट येईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे पूर्व पुण्यातील आर्थिक आणि शैक्षणिक विकासाला नवसंजीवनी मिळेल. मंजुरीनंतर हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.