Pune News : पुणे अन पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दरम्यान आता पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहराच्या पूर्व व दक्षिणेकडील वेगाने वाढणाऱ्या परिसरांना मेट्रो सेवेशी जोडण्यासाठी महत्त्वाची पायरी पार करत, राज्य सरकारने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमेट्रो मार्गिकांना गुरुवारी औपचारिक मान्यता दिली.
आता या दोन्ही प्रस्तावांना अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवले जाणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती येणार आहे. हे दोन्ही मार्ग पुणे मेट्रो टप्पा – दोन मधील खडकवासला ते हडपसर–खराडी या मुख्य मार्गिकेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत.

हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वेगाने विस्तारत असलेल्या उपनगरातील वाढत्या वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी मेट्रो हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे.
त्यामुळे या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, दैनंदिन वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या नोव्हेंबरमधील बैठकीत प्राथमिक मान्यता मिळाली होती.
त्यानंतर राज्य सरकारने औपचारिक शासन निर्णय जारी करून अंतिम राज्यस्तरीय अनुमती दिली आहे. दोन उपमार्गिकांची एकूण लांबी सुमारे १६ किलोमीटर असून, त्यामध्ये १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल.
हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग ११.१०२ किलोमीटर लांबीचा असेल, तर हडपसर बस डेपो ते सासवड रोड या मार्गाची लांबी ५.५५७ किलोमीटर इतकी असणार आहे. दोन्ही मार्गांसाठी एकूण अंदाजे ५,७०४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेने जमीन, भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामांसाठी ४०३.३६ कोटी रुपये महामेट्रोला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
महामेट्रोकडून हा संपूर्ण प्रकल्प ‘उन्नत मेट्रो मार्गिका’ स्वरूपात राबवण्यात येणार असून, डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
या दोन मार्गिकांच्या उभारणीमुळे हडपसर, सासवड आणि लोणी काळभोर परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, तसेच पुण्याच्या वाहतूक व्यवस्थापनातही लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.













