Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत सोबतच मेट्रोचे देखील जाळे विकसित केले जात आहे. दरम्यान आता याचं वाहतूक कोंडीचा उतारा म्हणून कोथरूडमधील कचरा डेपो ते चांदणी चौकदरम्यान नवा दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे.
या पुलाचा पहिला मजला हा रस्ते वाहतुकीसाठी असेल अन त्यावर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. हा पूल उभारण्यासाठी येणारा खर्च पुणे महापालिका उचलणार आहे. मात्र याचे काम महा मेट्रो कडून केले जाणार आहे. शहरात यापूर्वी नळस्टॉप व गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.

त्यापाठोपाठ आता पौड रस्त्यावर हा तिसरा दुमजली पूल साकारला जाणार आहे. नक्कीच यामुळे कोथरूड भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी दूर होईल अशी आशा आहे. आता आपण हा दूमजली उड्डाणपूल नेमका कसा राहिला या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खरेतर, पुण्यात कोकण, सातारा, वाकड, हिंजवडी व मुंबईहून मोठ्या प्रमाणावर प्रवासी चांदणी चौकातून कोथरूडमार्गे शहराच्या मध्यवर्ती भागात जातात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
यामुळे आता कोथरूडमधील कचरा डेपो-टीव्हीएस शोरूम ते लोहिया आयटी पार्कदरम्यान 90 कोटी रुपयांचा खर्च करून हा पूल उभारला जाणार आहे. महामेट्रोने त्याबाबतचा आराखडा पुणे महापालिकेला सादर केला असून महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
कोथरूड डेपो, नळस्टॉप, लोहिया आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते. अवघ्या दीड किलोमीटरच्या या मार्गावर अनेक छोटे चौक, सिग्नल आणि वाढलेल्या नागरीकरणामुळे वाहतुकीवर ताण वाढतो.
त्यामुळे येथील नागरिक आणि प्रवाशांकडून दुमजली पूल उभारण्याची मागणी केली जात होती. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचा विस्तार चांदणी चौकापर्यंत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्याचसोबत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चारपदरी दूमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या दुमजली उड्डाण पुलाबाबत बोलायचं झालं तर याची लांबी 715 मीटर इतकी आहे. या उड्डाण पुलाची रुंदी 14 मीटर इतकी असून हा एक चार पदरी उड्डाणपूल आहे म्हणजेच एका दिशेने दोन लेन आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 90 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.