पुणे रिंगरोड व तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी डेडलाइन जाहीर ! कधीपर्यंत पूर्ण होणार काम? वाचा….

Published on -

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळकडून पूर्ण केला जाणार आहे. दरम्यान आता याच प्रस्तावित असलेल्या रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे.

रिंग रोडची सद्यःस्थिती तसेच तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे सविस्तर माहिती मागितली होती. हे दोन्ही प्रकल्प पुणे महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आमदार शेळके यांनी सभागृहात सांगितले की, तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा महामार्ग औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीतील हजारो कामगार, उद्योजक, मालवाहतूकदार दररोज या मार्गावरून प्रवास करतात.

मात्र, रस्त्याची दुरवस्था, मोठे खड्डे, अरुंद पट्टे आणि प्रचंड वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यासाठी किमान तीन महिने लागणार आहेत. प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तोपर्यंत नागरिकांनी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा त्रास सहन करायचा का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची ठाम मागणी केली. खड्डे बुजवणे, रस्त्याचे मजबुतीकरण, संकेत फलक, प्रकाशयोजना आणि छेद रस्त्यांवर सुरक्षित वाहतूक व्यवस्था तात्काळ करता येईल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत माहिती दिली. पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागातील कामे मे 2027 पर्यंत, तर पूर्व विभागातील कामे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे–पिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या बाबतीत निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असून, तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना शक्य आहेत का याची तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले.

या चर्चेमुळे मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, तातडीच्या उपाययोजना झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन दैनंदिन प्रवास सुलभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News