Pune News : मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच या दोन्ही शहरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दरम्यान या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

हा महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय अशी माहिती संबंधितांकडून मिळाली असून हा मार्ग नव्या वर्षात सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मे 2026 पर्यंत हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचा किमान अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण काम 96 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, अत्यंत महत्त्वाचा असलेला केबल-स्टेड डेक जोडणीचा टप्पा अंतिम अवस्थेत आहे. केवळ एक छोटा स्पॅन उरल्यामुळे पुढील काही महिन्यांत डेकची एंड-टू-एंड जोडणी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पात दोन भव्य बोगदे बांधण्यात आले आहेत. लोणावळा तलावाजवळील या बोगद्यांपैकी एक अंदाजे 9 किमी आणि दुसरा सुमारे 2 किमी लांबीचा आहे. विशेष म्हणजे, 9 किमीचा बोगदा हा आशियातील सर्वात रुंद डोंगर व तलावाखाली जाणारा टनेल ठरणार आहे.
जमिनीपासून तब्बल 180 मीटर उंचीवर तयार करण्यात आलेल्या प्रचंड केबल-स्टेड संरचनेवर या बोगद्यांची रचना असल्याने हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी ठरणार आहे. या मार्गावर अनेक दऱ्याखोऱ्यांमधून जावे लागते.
त्यामुळे 100 मीटर खोल दरीत व्हायाडक्ट उभारणे अभियंत्यांसमोर मोठे आव्हान होते. शिवाय लोणावळा–खंडाळा परिसरातील 640 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. खोपोली एक्झिटपासून कुसगावपर्यंत 13.3 किमी लांबीचा हा पर्यायी मार्ग 2019 मध्ये सुरू करण्यात आला.
यात दोन आठ-लेन बोगदे, 790 व 650 मीटर लांबीचे व्हायाडक्ट्स आणि उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था असेल. प्रकल्पासाठी 6,600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कार्यान्वयनानंतर वाहनांना ताशी 120 किमी वेग मिळू शकणार आहे.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प मे 2026 मध्ये कार्यान्वित झाल्यास, दोन्ही शहरांतील कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.













