पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी….! पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाचा आराखडा झाला रद्द, कारण काय ?

Pune News : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे हे मेट्रोच्या नकाशावर आले आहे. सद्यस्थितीत पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड मध्येही मेट्रो सुरु झालीये. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे.

तसेच या मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाचे पण काम हाती घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा पिंपरी चिंचवड मधील भाग म्हणजेच दापोडी ते पिंपरी हा आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो मार्गाचा थेट निगडी पर्यंत विस्तार सुरु झाला आहे. या विस्तारीकरण अंतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंत जवळपास साडेचार किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित केला जातोय.

दापोडी ते निगडी याचाही पुढे चाकण पर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निगडी ते चाकण या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सुद्धा तयार झाला होता.

मात्र आता याच विस्तारित प्रकल्पाच्या डी पी आर बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विस्तारित मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

खरंतर या विस्तारित मेट्रोमार्ग प्रकल्पाच्या अहवालात 31 मेट्रो स्थानके आणि हा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) राहणार हाेता. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक 25, तर चाकण नगरपरिषद हद्दीत सहा मेट्रो स्थानके तयार केली जाणार हाेती. या प्रकल्पासाठी दहा हजार 383 कोटी 89 लाख खर्च होणार असा अंदाज हाेता.

हा आराखडा मेट्राेने महापालिकेला ऑगस्टमध्ये सादर केला होता. तसेच सप्टेंबरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, शहरातील लाेकप्रतिनिधी, भागधारकांना या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते.

यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या आराखड्यात बदल सुचवलेत. वाढती लाेकसंख्या, प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आराखड्यामध्ये सुधारणा करून तीन डब्यांऐवजी सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या ठेवाव्यात अशी महत्त्वाची सूचना लोकप्रतिनिधींनी दिली.

याशिवाय भक्ती-शक्ती चाैक ते तळवडे चाैक मार्गे चाकण एमआयडीसी असा मेट्राे मार्ग करण्याच्याही सूचना मिळाल्या होत्या. तसेच मेट्रो मार्गिकेचे संरेखन नाशिकफाटा-भोसरी असे करावे अशी लोकप्रतिनिधींची शिफारस होती.

यासाठी भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिकफाटा ते चाकणपर्यंत करावी असा सल्ला देण्यात आला होता.

भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी असे पण सुचवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ⁠मेट्रो स्थानकच्या जवळपास वाहनतळाची व्यवस्था करावी अशी पण सूचना लोकप्रतिनिधींनी दिली होती.

दरम्यान पालकमंत्री अजित पवार यांनी या सूचनांच्च्या आधारावर नवीन डीपीआर तयार करण्याचे सुचवले. यानुसार सुधारित आराखडा तयार करण्याचे काम आता मेट्रो ने हाती घेतले आहे.

दरम्यान हा डीपी आर म्हणजेच सविस्तर प्रकल्प आराखडा येथे एका महिन्यात पूर्ण होईल. दरम्यान या नव्याने तयार केल्या जाणाऱ्या आराखड्यात भोसरीचा समावेश करायचा की नाही याबाबत सध्या विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आराखडा तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना आराखडा दाखवला जाईल आणि त्यानंतर मार्ग कसा ठेवायचा याबाबत निर्णय होणार अशी माहिती दिली जात आहे.

दरम्यान डी पी आर फायनल झाल्यानंतर महापालिका राज्य शासन आणि मग केंद्र शासनाची मंजुरी घेतली जाईल आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.