Pune News : पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली असून अजूनही जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तसेच रेल्वे प्रकल्पांची कामे देखील युद्धपातळीवर केली जात आहेत. याशिवाय, विमानाचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्याला आगामी काळात आणखी एक नवीन विमानतळ मिळणार आहे. हे विमानतळ जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात तयार होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय. दरम्यान आता याच पुरंदर विमानतळाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

काय आहेत डिटेल्स?
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी काल एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न झाली आहे.
दरम्यान कालच्या या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाबाबत चर्चा झाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठीच्या कार्यपद्धतीबाबत कालच्या या बैठकीत संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
खरेतर, गेल्या दोन वर्षांत पुरंदरमध्ये विमानतळ होणार असल्याने या प्रकल्प क्षेत्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. पुरंदर विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावेळी या संबंधित परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे आता भविष्यात या ठिकाणी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ नये त्यासाठी कालच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उच्चाधिकार समितीने तातडीने अंतिम अधिसूचना काढून या परिसरातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी सूचना केल्या आहेत.
म्हणजे आता पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या परिसरात यापुढे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीयेत. खरे तर पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी आधी 3200 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला होता.
मात्र हा प्रकल्प दोन वर्षांपासून प्रस्तावित आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यास 3200 कोटी रुपये लागणार होते. मात्र आता हा भूसंपादनाचा खर्च 300 कोटी रुपयांनी वाढला आहे. म्हणजेच आता हा प्रकल्प आणखी खर्चीक होणार आहे.
यामुळे आता तरी हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाला पाहिजे नाहीतर या प्रकल्पाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुरंदर विमानतळ भूसंपादनसंदर्भात अधिसूचना निघाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यातील संबंधित गावांमध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मोजणी करण्यासाठी अक्षांश रेखांश निश्चित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून खाजगी संस्था नियुक्त केली जाणार आहे आणि या खाजगी कंपनीच्या माध्यमातून मग या प्रकल्पाची पुढील कार्यवाही वेगाने होणार आहे.
या गावात जमिनीचे संपादन होणार
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी तालुक्यातील वनपुरी, पारगाव-मेमाणे, कुंभार वळण, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या गावात भूसंपादन केले जाणार आहे. दरम्यान या संबंधित गावांची चार टप्प्यांत विभागणी करून चार महसूल अधिकारी भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.