Pune News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. दरम्यान याच रस्ते विकासाच्या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
या प्रकल्पातील आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग असणाऱ्या 31 किलोमीटर लांबीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे. यानुसार, यासंबंधीत 31किलोमीटर लांबीच्या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे. खरेतर, रिंग रोड प्रकल्पाचे काम एकूण 9 टप्प्यात पूर्ण केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्यांच्या सर्वच टप्प्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. दरम्यान यातील पश्चिम रिंग रोडचे काम पुढील 24 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा मानस आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून अशी माहिती देण्यात आली आहे.
रिंग रोड प्रकल्पातील पश्चिम टप्प्याचे काम जवळपास वीस-बावीस टक्के पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून येत्या 24 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार असा दावा होतोय.
पावसाळा संपल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून यंदाचा पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजेच मे महिन्यापर्यंत या प्रकल्पातील बहुतांशी कामे पूर्ण केली जाणार आहेत. पश्चिम टप्प्यातील कामांसाठी डिसेंबर 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
आता या मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करत आहे. दरम्यान पूर्व रिंग रोड प्रकल्पाच्या कामासाठी मे 2028 पर्यंत मुदत आहे. अर्थात 2028 संपेपर्यंत हा प्रकल्प सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे छत्रपती संभाजी नगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आणि पुणे रिंग रोड काही ठिकाणी एकत्र येतो. यामुळे सुरवातीला ज्या भागात हे दोन्ही प्रकल्प एकत्र येतात त्या भागाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्याचे ठरवण्यात आले होते.
नगर रस्त्यापासून सोलापूर रस्त्याला आणि पुढे पुणे बेंगलोरु महामार्गाला जोडणाऱ्या जवळपास 31 – 32 किलोमीटर मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे असे यापूर्वी ठरवण्यात आले होते.
मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नंतर यामध्ये बदल करत हे काम सुद्धा राज्य रस्ते विकास महामंडळाने करावे असे सांगितले आणि यानुसार महामंडळाकडून या 31 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आले.
मात्र या 31 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या निविदा ज्यादा किमतीने सादर झाल्यात आणि म्हणूनच आधीच्या निविदा रद्द करत आता फेरनिविदा काढण्यात आली आहे.
दरम्यान या 31 किलोमीटर लांबीच्या टप्प्यासाठीच्या फेरनिविदा लवकरच अंतिम केल्या जातील आणि प्रत्यक्षात याचे पण काम सुरू होईल अशी माहिती आता महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.













