पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी सुरू, प्रवाशांचा वेळ वाचणार

Published on -

Pune News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर शहरात सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. काही मेट्रो मार्ग प्रकल्पांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल केला जात आहे. गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीत देखील मेट्रोच्या कामांसाठी बदल करण्यात आला होता. नोव्हेंबर 2024 पासून हा बदल लागू होता.

मात्र आता गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे. ही शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफीस चौक यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

खरे तर पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौक दरम्यान टाटा मेट्रो कडून पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नोव्हेंबर 2024 पासून हे काम सुरू करण्यात आले होते अन तेव्हापासूनच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.

पण आता पुन्हा एकदा या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. गुरुवार 20 मार्च 2025 रोजी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरीता दुहेरी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असल्याची माहिती पुणे शहराच्या शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेने काल याबाबतचा निर्णय घेतला असून यामुळे पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शहरातील गणेशखिंड रस्त्यावर टाटा मेट्रोकडून 26 नोव्हेंबर 2024 पासून पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात आली होती.

ही वाहतूक एबिल कॉर्नर- सिंफनी सर्कल ते न.ता.वाडी मार्गे सुरू होती. गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याने वाहनचालकांना लांब वळसा घालून जावे लागत होते. मात्र आता पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकापासून सिमला ऑफीस चौकापर्यंत दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचा आदेश नुकताच निर्गमित केला असून यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दुहेरी वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा असून, प्रवासातील वेळेची बचत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe