Pune News Today : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही एक नवीन बससेवा सुरू होणार आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही अनेक पर्यटक येतात.
दरम्यान पुण्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता याच मालिकेत पीएमपी प्रशासनाच्या माध्यमातून ओपन गॅलरी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या जगप्रसिद्ध शहरांमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी ‘ओपन गॅलरी बस’ सेवा आता पुण्यातही प्रत्यक्षात नजरेस पडणार आहे. या ओपन गॅलरी बस सेवेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना पुणे शहराचे विहंगम दृश्य आपल्या उघड्या डोळ्याने पाहता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलतर्फे लवकरच ‘मेक इन पीएमपीएमएल’ संकल्पनेवर आधारित ओपन गॅलरी बससेवा सुरू होणार आहे. खरे तर ही सेवा आधीच महाराष्ट्रातील मुंबई शहरात सुरू आहे.
दरम्यान आता ही सेवा पुण्यात पण सुरू होईल आणि यामुळे येथील पर्यटन वाढीस मोठा हातभार लागणार आहे. ही सेवा पुणेकरांसाठी एक नवा, रोमांचक आणि अनोखा अनुभव देणारी राहणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून ही ओपन गॅलरी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बस सध्या पीएमपीच्या कार्यशाळेत तयार होत असून याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
म्हणजेच लवकरच शहरात ही गाडी आपल्याला धावताना दिसणार आहे. या नव्या बससेवेचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या उघड्या गॅलरी असलेल्या छतावरून नागरिकांना शहराचे अद्वितीय दर्शन घेता येणार आहे.
ही बस सेवा शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांसाठी सुरू होणार आहे. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, जुन्या इमारतींची नयनरम्य वास्तुकला, सांस्कृतिक वारसा, गजबजलेली बाजारपेठ आणि नव्या पुण्याचे बदलते स्वरूप या बससेवेच्या माध्यमातून पर्यटकांना दाखवता येणे शक्य होणार आहे.
यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. ही बस सेवा शनीवार वाडा, टिळक स्मारक, शनिवार पेठ, पुणे विद्यापीठ परिसर, शनिवारवाडा ते कात्रज मार्गावर चालवली जाणार असा अंदाज दिला जातोय.
जगातील मोठ्या शहरांमध्ये जसे की लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, हॉंगकॉंग अशा ठिकाणी पर्यटनासाठी ‘ओपन डेक बस’ ही लोकप्रिय संकल्पना आहे. या शहरांमध्ये या बस सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा दिला जातो. याच धरतीवर राज्याची राजधानी मुंबईतही ‘मुंबई दर्शन’ सेवा उपलब्ध आहे.
यामुळे पुण्यात ही ओपन डेक बस चालवली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती आणि आता याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पीएमपीएल प्रशासनाच्या माध्यमातून पुण्यात ओपन डेक बस सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना पुणे दर्शनाची नवी सोय उपलब्ध होणार असून, पीएमपीएमएलच्या उत्पन्नात सुद्धा मोठी वाढ होणार आहे.













