Pune News : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसतायेत. पुणे ते शिरूर या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या पाहायला मिळत होते.
यामुळे या मार्गावर आता दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. पुणे ते शिरूर दरम्यान दूमजली उड्डाणपूल विकसित झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास देखील व्यक्त होतोय. दरम्यान, आता याच उड्डाणपूल प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर काल 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला.

अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. विधिमंडळात सादर झालेल्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करून देण्यात आली. पुण्यातील काही प्रकल्पांसाठी देखील करोडो रुपयांची तरतूद यात झालेली आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुणे ते शिरूर दरम्यानच्या दुमजली उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पात साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
पुणे ते शिरूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी 7515 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून देण्यात आली असली तरी देखील पुण्यातील इतर प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात कोणतीच विशेष तरतूद नसल्याने पुणेकरांमध्ये नाराजीचा सूर सुद्धा उमटत आहे.
पुरंदर विमानतळ, पुणे नाशिक ग्रीन कॉरिडोर , मुंबई पुणे बेंगलोर हाय स्पीड ट्रेन, रिंग रोड यांसारखे पंधराहून अधिक प्रकल्प सध्या पुण्यात प्रस्तावित आहेत. मात्र या प्रस्तावित प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात कोणतीचं तरतूद करून देण्यात आली नाही. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महायुती सरकार मध्ये पुण्यातील 21 पैकी 19 आमदार आहेत. मात्र संख्याबळ असतानाही पुण्यासाठी काही खास तरतूद झालेली नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसहित विरोधकांच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला जात आहे. आता आपण अर्थसंकल्पात पुण्यासाठी नेमक्या काय तरतुदी करून देण्यात आल्या आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
अर्थसंकल्पात पुण्याला काय मिळालं?
तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबीच्या चार पदरी उड्डाणपुलासाठी 6499 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
पुणे ते शिरूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या दोन मजली उड्डाणपुलासाठी 7515 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
पुण्यातील मेट्रोच्या प्रकल्पांसाठी देखील तरतूद करून देण्यात आली आहे. पुणे नागपूर आणि मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एकत्रित 143 कोटी रुपयांची तरतूद आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे तयार होत असलेल्या शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी आणखी 50 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.