Pune Purandar Airport Latest Update : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून अलीकडे पुण्याची ओळख तयार झाली आहे. पुणे जिल्ह्याला आगामी काळात एक नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे.
दरम्यान आता याच नव्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 एप्रिल पासून या प्रकल्पाच्या एका महत्त्वाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

येत्या चार दिवसांनी पुण्यातील महत्त्वाकांक्षी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूखंडाचे ड्रोन सर्वेक्षण सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्वेक्षण या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
दरम्यान पुणे जिल्हा प्रशासनाने या सर्वेक्षणासाठी संपूर्ण तयारी केली असून, या प्रक्रियेमुळे भूखंडाच्या अचूक सीमा निश्चित करण्यास मदत होणार असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून दिली जात आहे. दरम्यान आता आपण या सर्वेक्षणामुळे नेमकां काय फायदा होणार? याची माहिती जाणून घेणार आहोत.
काय फायदा मिळणार?
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी येत्या नऊ तारखेला ड्रोन सर्वेक्षण सुरू होणार असून या ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्राचा भूगोल (टोपोग्राफी) आणि भूखंडाची नेमकी माहिती मिळू शकणार आहे.
यामुळे भूखंड वाटप, मोजणी तसेच संभाव्य अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने नियोजन सुलभ होईल, असे सांगितले गेले आहे. खरंतर पुरंदर विमानतळ प्रकल्प हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी अंदाजे 2400 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या विमानतळाच्या उभारणीसाठी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून समन्वय साधला जात आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण केल्यामुळे कमीत कमी वेळेत अधिक अचूक माहिती गोळा करता येणे शक्य होणार आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.
मात्र, या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असून, जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र येत्या पाच दिवसानंतर जे सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे त्या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या माहितीनुसारच या प्रकल्पासाठी पुढील पावले उचलली जातील.