Pune Railway News : पुण्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर येत्या काही दिवसात गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. यासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त स्थायिक झालेली जनता आपल्या गावाकडे परतणार आहे. गणेशोत्सवाचा सण हा संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात साजरा होतो.
मात्र कोकणात या सणाला विशेष महत्व आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरात वास्तव्याला असलेली कोकणातील जनता गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे परतत असते.
म्हणून दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळातही रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होणार असून या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुण्याहून रत्नागिरीसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महत्वाचे म्हणजे या ट्रेनसाठी 7 ऑगस्ट पासून बुकिंग देखील सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-रत्नागिरी विशेष एक्सप्रेस ट्रेन गाडी क्रमांक 01447 पुणे येथून 7 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला ००:२५ वाजता रवाना होणार आहे आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचणार आहे. म्हणजे या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
01448 या विशेष गाडीच्या देखील 2 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ ला सोडली जाणार आहे. ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून या दिवशी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही साप्ताहिक विशेष गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.