Pune Railway News : राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला आणि विदर्भातील गोंदियाला नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे.
मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटचे खासदार भारतीय पारधी यांनी या नव्या गाड्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून रेल्वे कडून महाराष्ट्र, छ्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या दोन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे महाराष्ट्र ते मध्यप्रदेश हा प्रवास वेगवान होईल. दरम्यान आता आपण रेल्वे कडून कोणत्या दोन एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे, याचा रूट कसा असणार या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या दोन मार्गांवर धावणार सुपरफास्ट ट्रेन?
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्यप्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दोन नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे.
प्रवाशांच्या मागणीवर आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला सकारात्मक असा प्रतिसाद देत अश्विनी वैष्णव यांनी दोन एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या रिवा गोंदिया पुणे या मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
यासोबतच छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणाऱ्या जबलपूर गोंदिया रायपूर या मार्गावर देखील नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
नक्कीच या दोन्ही गाड्यांमुळे गोंदियामधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रीवा गोंदिया पुणे या गाडीचा पुणेकरांना देखील मोठा फायदा होईल. पुण्यावरून धावणाऱ्या या गाडीमुळे पुणे ते मध्यप्रदेश हा प्रवास वेगवान होणार आहे.
या गाड्यांच्या रूट बाबत बोलायचं झालं तर जबलपूर ते रायपूर ही सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन जबलपूर-नैनपूर-बालाघाट मार्गे गोंदिया आणि मग रायपूरला जाणार अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच रिवा ते पुणे ही गाडी रिवा -सतना-जबलपूर-नैनपूर-बालाघाट- गोंदिया, नंतर नागपूर मार्गे पुण्यापर्यंत चालवली जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.