Pune Railway News : पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. पुणे आणि परिसराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता, येथील रेल्वे वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी नुकतेच एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील चार प्रमुख रेल्वे स्थानकांच्या विकासाला गती देण्यात आली असून, यात उरळी येथे सर्वांत मोठ्या टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे.

संसद अधिवेशनात याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुण्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्या रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार?
शहराचे शैक्षणिक आणि औद्योगिक महत्त्व वाढल्यामुळे देशभरातून पुण्यासाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. खासकरून जबलपूर, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागांतून अधिक गाड्या सुरू करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकाचे संपूर्ण रिमॉडेलिंग करण्यात येणार असून, हडपसर टर्मिनल आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचाही विकास केला जात आहे.
उरळी येथे विकसित होणाऱ्या नव्या टर्मिनलमुळे पुणे स्थानकावरील गर्दी कमी होईल. भविष्यात पुणे स्थानकावर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उरळीपर्यंत विस्तारित होतील, जिथे त्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाईल.
परिणामी, पुण्यातील रेल्वे वाहतूक अधिक सुटसुटीत होईल आणि नवीन गाड्या सुरू करण्यास मदत होईल. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि पुण्याच्या रेल्वे नेटवर्कला अधिक बळकटी मिळेल. नक्कीच या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.