Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे. ही वाहतूककोंडी दूर व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, आता पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरे तर या महामार्ग प्रकल्पाचे काम दोन भागात केले जाणार आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम होणार आहे. तसेच या संपूर्ण रस्त्याचे काम एकूण 9 टप्प्यात केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्वच्या सर्व नऊ टप्प्यांसाठी कंत्राटदाराची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून, आता या रस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एम एस आर डी सी च्या सूत्रांकडून या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे भूमिपूजन फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने या रिंग रोड लगतच्या 117 गावांच्या विकासासंदर्भातही नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
या रिंग रोड लगत जी 117 गावी आहेत त्या गावांचा विकास करण्याची जबाबदारी ही राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील राज्य रस्ते विकास महामंडळानेच केले आहे आणि आता या रिंग रोड लगत असणाऱ्या गावांचा विकासही राज्य रस्ते विकास महामंडळ करणार असून या गावांच्या विकासासाठी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
म्हणजेच आता एमएसआरडीसी कडून या संबंधित 117 गावांच्या विकासाचा सबंध प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प आराखडा म्हणजेच डीपीआर येत्या काही दिवसांनी तयार होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार हा डीपीआर येत्या आठ महिन्यात तयार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण पुणे रिंग रोड लगत असणाऱ्या कोणकोणत्या गावांचा विकास होणार आहे, कोणत्या गावांचा विकास आराखडा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केला जाणार आहे ? याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.
या गावांचा विकास होणार ?
हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे या तालुक्यातील गावांचा विकास राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ भोर तालुक्यातील भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डर, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी या गावांचा विकास करणार आहे.
पुरंदर तालुक्याबाबत बोलायचं झालं तर तालुक्यातील कोडित खुर्द, पूर, पोखर, वारवाडी, कुंभोशी, सोमुडर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे या गावांचा विकास केला जाणार आहे. मुळशी तालुक्यातीलही अनेक गावांचा या प्रकल्पांतर्गत विकास होणार आहे.
मुळशी तालुक्यातील मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंदूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले या गावांचा विकास करण्याचे नियोजन एम एस आर डी सी ने आखले आहे. तसेच वेल्हे तालुक्यातील वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे या गावांचा देखील विकास केला जाणार आहे.
हवेली तालुक्यातील गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी या गावांचा विकास केला जाणार आहे. यामुळे या संबंधित पाचही तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय.