Pune Ring Road News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात आता मुंबई प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आता युद्ध पातळीवर प्रयत्न केला जातोय.
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग रोड विकसित केला जात असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील एक नवीन रिंग रोड तयार करणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला असून आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. आता पीएमआरडीएकडून ‘रिंग रोड’ची कनेटिव्हिटी वाढविण्यात येणार आहे.
प्राधिकरणाने कोणता निर्णय घेतला?
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमआरडीकडून विकसित केल्या जाणाऱ्या रिंग रोडला जोडणारे 15 महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 145 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान पुणे रिंग रिंग रोड प्रकल्प अंतर्गत 15 इंटरचेंज विकसित झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, असा सुद्धा दावा केला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएमआरडीएने अलीकडेच आपला अर्थसंकल्प मांडला आणि यामध्ये नियोजित वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), पुणे-सातारा मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करून देण्यात आली आहे.
तसेच पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूद यात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात रिंग रोड प्रकल्पांतर्गत 15 इंटरचेंज तयार करण्याचा निर्णय सुद्धा झाला आहे.
पुण्याला मिळणार आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट
दुसरीकडे पुणेकरांना लवकरच एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्ग विकसित केला जात असून हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर साकारला जात आहे. दरम्यान आता हा मेट्रो मार्ग ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या प्रकल्पाचे उर्वरित काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होईल असे बोलले जात आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठ महिन्यात या प्रकल्पाचे बाकी राहिलेले काम पूर्ण केले जाणार आहे.