Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होताना दिसतायेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी वाहतूक कोंडीच्या समस्येचा गेल्या काही वर्षांपासून सामना करत आहे. मात्र आता सांस्कृतिक राजधानीतील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे.
कारण की पुणे रिंग रोडचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प एक मोठा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित होत असणाऱ्या याच रिंग रोड प्रकल्पासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात होत आहे. या पूर्व आणि पश्चिम रिंग रोडचे काम एकूण नऊ पॅकेज मध्ये केले जाणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प 42 हजार 711 कोटी रुपयांचा असून या प्रकल्पाच्या 9 पॅकेजच्या कामासाठी ठेकेदारांची निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पासाठी एकूण पाच ठेकेदार कंपन्यांची निवड झाली असून आता या कंपन्यांपैकी काही कंपन्यांना वर्क ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवयुग कंपनीला तीन आणि पीएनसी कंपनीला एक अशा चार पॅकेजसाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. विशेष बाब अशी की मेघा कंपनीला तीन पॅकेजेस, जीआर आणि रोडवेज या कंपन्यांना प्रत्येकी एक अशा पाच पॅकेजसाठी ‘वर्क ऑर्डर’ देण्याची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे.
अर्थातच या कंपन्यांना देखील लवकरच वर्क ऑर्डर मिळणार आहे. खरे तर पुणे रिंग रोड प्रकल्पातील पूर्व आणि पश्चिम भागातील सर्व पॅकेजेची कामे एकाच वेळी सुरू करावीत, यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा आग्रह आहे.
खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या भागातून कामाचे टप्पे सुरू होतील, असे सांगितले जात आहे. पूर्व भागातील रिंग रोड प्रकल्पांतर्गत ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडीपर्यंतचे (पुणे-सोलापूर रस्ता) रस्त्याचे काम केले जाणार असून या रस्त्याच्या १९,९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना मान्यता मिळाली आहे.
तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२,७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. एकंदरीत सध्या या प्रकल्पाच्या कामासाठी वर्क ऑर्डर देण्याचे काम सुरू असून वर्क ऑर्डर दिल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.