Pune Sambhajinagar Highway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे आगामी काळात देशाला अनेक नवनवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. राज्याला देखील आगामी काळात एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी अलीकडील बजेट सत्रात महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांची माहिती दिली. यात महाराष्ट्रातील पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गावर ग्रीन हायवे तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान तयार केल्या जाणाऱ्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.

हा नवा महामार्ग विकसित करण्यासाठी सुमारे 15,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सध्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सहा तासांचा वेळ लागतो मात्र नवा महामार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी दोन तासांवर येणार आहे.
हे 2 महामार्ग प्रकल्पही विकसित होणार
खरेतर, देशभरातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महामार्ग, एक्सप्रेसवे, पूल आणि बोगद्यांच्या निर्मितीला वेग देण्यात आला आहे. अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत, तर काही अद्याप निर्माणाधीन आहेत.
पुणे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे, तसेच मराठवाड्यासाठी दार ठरणाऱ्या संभाजीनगरशी त्याचा मजबूत संपर्क आवश्यक आहे. याचमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवा महामार्ग विकसित होणार आहे.
तर दुसरीकडे दिल्ली-कटरा आणि इंदूर-हैदराबाद महामार्ग यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरही केंद्र सरकार काम करत आहे. दिल्ली ते कटरा हा महामार्ग प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी करणार आहे. जम्मू-श्रीनगर प्रवास हा नवा महामार्ग विकसित झाल्यानंतर 9 ऐवजी केवळ 3 तासांत शक्य होईल.
इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात नांदेडपर्यंतचा भाग विकसित केला जात आहे, त्यानंतर तो थेट हैदराबादपर्यंत वाढवला जाईल. याशिवाय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर सरकार भर देत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 2 लाख कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 105 हून अधिक बोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून एशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचे काम 5,500 कोटींच्या खर्चाने पूर्ण सुद्धा झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धर्तीवर NHIDCL ची स्थापना करून डोंगरी आणि दुर्गम भागांमध्ये महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत.
अशा प्रकल्पांमुळे देशाच्या प्रत्येक भागाचा दळणवळण अधिक सुकर होईल आणि वाहतुकीस नवसंजीवनी मिळणार आहे. एकंदरीत देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमुळे आगामी काळात देशातील रस्त्यांचे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे.