Pune Shirur News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प. खरे तर पुणे शहरात दोन रिंग रोड तयार होणार आहेत एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे तर दुसरा एक रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे ते शिरूरदरम्यान सहा-लेनचा उड्डाण पुल तयार करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. ही निविदा आता पुढल्या महिन्यात, 1 एप्रिल 2025 रोजी उघडण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी अंदाजे 7,515 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि शिरूरमधील वाहतूक सुलभ होणार असून, जून किंवा जुलै 2025 पर्यंत या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजे लवकरच या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार आहे आणि त्यानंतर नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) या तत्त्वावर आधारित असून, त्यासाठी 30 वर्षांची सवलत दिली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, या उड्डाण पुलासाठी फार अधिक भू-संपादन सुद्धा करावे लागणार नाही कारण हा मार्ग प्रामुख्याने विद्यमान पुणे-शिरूर महामार्गाच्या वरून बांधण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या मंजुरीबाबत बोलायचं झालं तर राज्य मंत्रिमंडळाने 2024 मध्ये या प्रकल्पास मंजुरी दिली असून, चार वर्षांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर NH 753F महामार्गाच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सध्या चार-लेन असलेल्या या मार्गावर 53.4 किमी लांबीचा सहा-लेन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन, प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पामुळे येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर या परिसरांना थेट फायदा होणार असून या प्रकल्पामुळे या भागातील एकात्मिक विकासाला सुद्धा चालला मिळणार आहे. तसेच, हा महामार्ग हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला शेंद्रा MIDC येथे जोडला जाणार आहे, त्यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील संपर्क अधिक सुकर होणार यात शंकाच नाही.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख करत, तो राज्याच्या पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे स्पष्ट केले.
या महामार्गामुळे वाहतूक सुरळीत होणार असून, औद्योगिक विकासालाही गती मिळणार आहे. एकंदरीत या प्रकल्पाच्या बांधकामाची निविदा येत्या एक तारखेला उघडली जाणार आहे आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे पुढील भवितव्य स्पष्ट होणार आहे.