Pune Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गामुळे (Pune–Solapur Highway) दोन्ही शहरांमधील प्रवास वेगवान आणि सोयीस्कर झाला असला, तरी गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग चिंतेचा विषय ठरला आहे.
विशेषतः सोलापूर-पुणे मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अपघात रोखण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

महामार्गावरील सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यादरम्यान एकूण ६ नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी मोहोळ येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
त्यामुळेच उर्वरित धोकादायक ठिकाणीही उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाने केलेल्या अभ्यासानुसार, या मार्गावर होणाऱ्या बहुतांश अपघातांची कारणे चुकीचा सर्व्हिस रोड वापर, अचानक महामार्गावर वाहनांची घुसखोरी आणि विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक ही आहेत.
सध्या महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोड चारचाकी आणि जड वाहनांसाठी अपुरे ठरत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालक महामार्गावर अचानक प्रवेश करतात किंवा धोकादायक ओव्हरटेक करतात.
महामार्गाचे काम सुरू असताना वाहतूक मर्यादित होती, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर वेग वाढला आणि त्यासोबतच अपघातांचे प्रमाणही वाढले. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल हा कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय मानला जात आहे.
मोहोळ आणि माढा तालुक्यातील चिखली, यावली, अर्जुनसोंड, शेटफळ, सावळेश्वर आणि रांझणी या सहा ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.
चिखली येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, यावली येथील काम पुढील दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्जुनसोंड येथे मात्र सर्व्हिस रोडचे काम अद्याप शिल्लक असून, ते पूर्ण होण्यासाठी सुमारे ११ महिने लागण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, उड्डाणपुलांच्या कामामुळे यावली, शेटफळ आणि चिखली परिसरात वाहतूक सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे. खराब रस्ते, खड्डे आणि अरुंद मार्गांमुळे वाहनचालकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













