Pune ST Bus Service : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाकडून पुण्यावरून एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान ही नवी बस सेवा सुरू करण्यात आली असून या नव्या बससेवेमुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्क फेज 3 ते छत्रपती संभाजी नगर या मार्गावर एसटी महामंडळाकडून शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या बससेवेचा फायदा काय ?
खरंतर, हिंजवडी हे पुण्यातील प्रसिद्ध आयटी पार्क आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. यामुळे हिंजवडी येथे राज्यातील कानाकोपऱ्यातील लोक नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आलेले आहेत.
या परिसरात अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. दरम्यान, यातील बहुतांशी कामगार आणि आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी गावाकडे निघतात.
मात्र हिंजवडी येथून थेट अहिल्यानगरला जाण्यासाठी किंवा छत्रपती संभाजी नगरला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नाहीये. आणि यामुळे या परिसरात वास्तव्याला असणाऱ्या नगर जिल्ह्यातील आणि संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
येथून थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने या संबंधित नागरिकांना आपल्या गावी जायचे असेल तर शिवाजीनगर किंवा मग स्वारगेटला जाऊन बस पकडावी लागते.
हेच कारण आहे की हिंजवडी ते संभाजीनगर दरम्यान थेट बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान आता प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली असून हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान थेट बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कस राहणार वेळापत्रक?
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. एस टी महामंडळाकडून याचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.
सदर वेळापत्रकानुसार, हिंजवडी आयटी पार्क फेज तीन येथून शिवनेरी बस दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सोडले जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर बस स्थानकातून दर सोमवारी पहाटे साडेचार वाजता शिवनेरी बस सोडली जाणार आहे.
दरम्यान एसटी महामंडळाकडून सुरू केल्या जाणाऱ्या या नव्या बससेवेमुळे हिंजवडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच येथे स्थायिक झालेल्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.