पुण्याच्या शेतकऱ्याने भात पिकाला फाटा देत सुरु केली झेंडूची शेती; ‘या’ जातीच्या लागवडीतून मिळवलं दर्जेदार उत्पादन

Ajay Patil
Published:
pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या नवनवीन आणि आधुनिक प्रयोगाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं वेगळं पण सिद्ध करून दाखवल आहे. भोर तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिकांच्या शेतीला छेद देत झेंडू लागवडीतून चांगले उत्पादन मिळवत पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वेगळेपण सिद्ध करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

भांबवडी येथील दीपक वीर नामक प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. वास्तविक भांबवडी व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भात या पारंपारिक पिकांची शेती होत असते. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण भात पिकावर अवलंबून आहे. परंतु काळाच्या ओघात शेतीमध्ये आता बदल पाहायला मिळत आहे.

भात पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी इतर पर्यायी पिकाच्या शोधात आहेत. असाच शोध घेत दीपक यांनी आपल्या 15 आर जमिनीत झेंडूची लागवड केली. विशेष म्हणजे झेंडू लागवड केल्यानंतर त्यांनी रासायनिक खतांचा अतिशय अत्यल्प वापर केला. त्यामुळे पीक दर्जेदार आले. शिवाय रासायनिक खतांवर होणारा खर्च वाचला परिणामी कमी खर्चात अधिक उत्पन्न त्यांना या पिकातून मिळाले आहे.

दीपक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी झेंडूच्या अष्टगंधा आणि टेनिस बॉल या दोन वाणाची लागवड केली. शेतीची पूर्व मशागत केल्यानंतर ओळींमध्ये तीन फुटाचे अंतर आणि रोपांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवत डिसेंबर महिन्यात झेंडूची लागवड केली. लागवड ही सरींवर करण्यात आली. साधारणत दर आठ दिवसांनी झेंडू पिकासाठी पाणी त्यांनी दिले.

पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्याने पाण्याचा अपव्यय टाळता आला शिवाय पीक देखील जोमदार बहरले. लागवडीनंतर मात्र दोन महिन्यात झेंडू पिकातुन त्यांनी उत्पादन मिळवून दाखवले आहे. उत्पादित झालेले झेंडू फुल दर्जेदार असून मुंबईच्या बाजारपेठेत याची विक्री होत आहे.

सध्या लग्न सराईचा हंगाम असल्याने बाजारात झेंडूला चांगली मागणी असून शंभर रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. दीपक यांनी झेंडूच्या फुलांना लग्न सराईत आणि गुढीपाडव्याच्या सणाला कायमच मागणी असते असं सांगितलं असून शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये पीक काढणीसाठी येईल या पद्धतीने झेंडूची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe