Pune To Shirdi Road : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर पुणे येथील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्याहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दररोज हजारो पुणेकर साईनगरी शिर्डी येथे दर्शनासाठी जातात. दरम्यान याच साई भक्तांचा शिर्डीकडील प्रवास आता वेगवान होणार आहे.
यासाठी एका महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पुणे ते शिर्डी यादरम्यान प्रवास करताना प्रवाशांचा 50 ते 60 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे आणि त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडी यादरम्यानचा रस्ता आता सिमेंट काँक्रेट चा होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याच्या कामाला आता सुरुवातही झाली आहे. या 36 किलोमीटरच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असुन पुणे ते शिर्डी यादरम्यान प्रवास करणाऱ्यांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता ते पानोडी दरम्यान 36 किलोमीटरचा काँक्रेट रस्ता तयार होणार असून या प्रकल्पासाठी अंदाजे 154 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. हा रस्ता पुणे-नाशिक महामार्गाला कनेक्ट होतो.
या मार्गामुळे पुण्याहून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांचे 50 ते 60 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. यामुळे साई भक्तांचा प्रवास वेगवान होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळच्या माध्यमातून हे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
या रस्त्याची रुंदी 7 मीटर राहणार आहे, पण दोन्ही बाजूंनी दीड-दीड मीटर मुरूमीकरण होईल ज्यामुळे या रस्त्याची रुंदी एकूण 10 मीटर होईल अन हा एक दोन पदरी मार्ग राहणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की केलवड, आश्वी आणि शिपलापूर या मोठ्या गावांमध्ये या रस्त्याचे काँक्रिटीकरण सात मीटर ऐवजी 10 मीटर राहील, दोन्ही बाजूंनी एक-एक मीटर पेव्हिंग ब्लॉक आणि दोन्ही बाजूंनी 1.200 मीटर साईड गटार सुद्धा असेल.
त्यामुळे या मोठ्या गावांमध्ये रस्त्याची रुंदी एकूण 14.5 मीटरपर्यंत राहणार आहे. यामुळे या गावांमधील वाहतूक कोंडीची समस्या देखील दूर होणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले असून आता पुढील 30 महिन्यात त्याचे काम पूर्ण होणार आहे.
कोणत्या गावांमधून जाणार हा रस्ता?
हा 36 किलोमीटर लांबीचा रस्ता राहाता, दहेगाव, केलवड, पिंपरी-लोकाई, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी, शिपलापूर व पानोडी या गावांमधून जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन रस्ता जोडला जाणार आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित केला असून राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडून या रस्त्याचे काम केले जाणार आहे.