Pune Traffic Jam : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता पुण्यातील काही भागांमधील वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्यात आला आहे.
हा बदल तात्पुरत्या स्वरूपातील राहणार आहे पण तरीही या बदलामुळे शहरातील काही भागांमधील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास व्यक्त होतोय. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावे यासाठी शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. तसेच मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

मात्र असे असले तरी संपूर्ण शहराला अजून पर्यंत मेट्रोची भेट मिळालेली नाही. यामुळे अजूनही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी कमी व्हावी या अनुषंगाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
गृहराज्यमंत्री महोदयांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती दिली आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे सुद्धा सांगितले. दुसरीकडे आता बाणेर, खराडी आणि विमानतळ भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केला आहे.
आज 12 मार्च 2025 पासून हा वाहतुकीचा बदल लागू होणार असून हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा राहणार आहे. यामुळे पुणेकरांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या भागातील वाहतुकीत नेमका कोणता बदल झाला आहे? पर्यायी मार्ग कोणते राहणार आहेत याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खराडी भागातील वाहतुकीचा बदल कसा असणार?
वाहतुकी भागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खराडी बायपासमार्गे खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळून खराडी गाव किंवा युआन आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा निर्णय आजपासून लागू राहणार आहे.
यामुळे आता या भागात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून सरळ पुढे अडीचशे मीटर अंतरावर जाऊन ‘आपले घर’ बसस्थानकाच्या पुढील बाजूस यू टर्न घ्यावा. तेथून खराडी दर्गा चौकातून डावीकडे वळण घ्यावे आणि आपल्या गंतव्यस्थानी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बाणेरमधील वाहतुकीतील बदल कसा राहणार?
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरातील महाबळेश्वर हॉटेल चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पाषाण रस्ता येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
नव्या बदलानुसार आता वाहन चालकांना बाणेर पाषाण लिंक रस्त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी डावीकडे वळून 45 आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू टर्न घेऊन हॉटेल महाबळेश्वर चौकातून विद्यापीठमार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
तसेच, बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्ता येथे जाण्यासाठीमाऊली पेट्रोल पंपाकडून यू टर्न घेऊन पुन्हा महाबळेश्वर हॉटेल चौकात यावे अन तेथून डावीकडे वळून बाणेर पाषाण लिंकमार्गे इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विमानतळ भागातील वाहतुकीतील बदल कसा राहणार?
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील न्यू एअरपोर्ट रस्त्यावर पुणे विमानतळाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना सिम्बायोसिस विधी महाविद्यालय चौकामध्ये उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
यामुळे आता या भागातील प्रवाशांना आजपासून दोराबजी मॉल चौकातून यू टर्न घेऊन किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे. हा निर्णय वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयाची वाहनचालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, या निर्णयाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.