Pune Traffic News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, स्वराज्याचे धाकले छत्रपती शंभूराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरूर तालुक्यातील वाहतुकीत महत्त्वाचा बदल झाला आहे.
उद्या अर्थातच 28 मार्च 2025 रोजी रात्री दहा वाजल्यापासून हा बदल लागू राहणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरूर तालुक्यातील वाहतुकीत नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

शिरूर तालुक्यातील वाहतुकीत बदल कसा राहील?
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वढू बु. येथे श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणात शंभू भक्तांची गर्दी अपेक्षित आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी शंभूरायांना अभिवादन करण्यासाठी शंभू भक्तांचीमोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
याचमुळे वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाहतुकीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. 28 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 मार्च 2025 च्या सकाळी 10 वाजेपर्यंत जड आणि मालवाहतूक वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहेत.
शंभू भक्तांची वाहने सोडून इतर अवजड वाहतूक कोरेगाव भीमा बाजूकडून येत असल्यास तिला सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण व पाबळ बाजूकडे वळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रशासनाकडून समोर आली आहे.
तसेच चाकण किंवा पाबळ बाजूकडून येणारी आणि पुण्याकडे जाणारी वाहने वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भीमा मार्गे पाठविण्यात येणार आहेत. शंभू भक्तांच्या वाहनांसाठी देखील ठराविक थांबा निश्चित करण्यात आले असून, कोरेगाव भीमा-वढू मार्गावर माहेर संस्थेजवळ असलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे भाविकांनी योजलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.