Pune Vande Bharat Express : महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क सातत्याने वाढवले जात आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना वंदे भारतची भेट मिळाली आहे. राज्यातील मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
येत्या काळात राज्याला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच आता पुणे ते हुबळी या मार्गावर सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी आता किर्लोस्करवाडी या रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे. या निर्णयामुळे किर्लोस्करवाडी येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातून सहा दिवस पुणे सातारा कराड जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन उपलब्ध राहणार आहे.
यामुळे रेल्वेने घेतलेल्या निर्णयाचे संबंधित परिसरातील प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा म्हणून या ट्रेनमधील प्रवासी संख्या आणखी वाढणार असा अंदाज आहे. किर्लोस्करवाडीतून हुबळी – धारवाड – बेळगाव – घटप्रभाला पण आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत गाडीने जाता येणार आहे.
किर्लोस्करवाडीत वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी खासदार विशाल पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केला होता. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे या संदर्भात संसदेत वेळोवेळी मागणी उपस्थिती केली होती. तसेच जिल्हा नागरिक जागृती मंचने दि. 5 जुलै रोजी याबाबत आंदोलनही पुकारले होते.
दरम्यान आता खासदार विशाल पाटील आणि जिल्हा नागरिक जागृती मंच यांचा पुढाकार यशस्वी झाला असून वंदे भारत ट्रेन अखेरकार किर्लोस्करवाडी स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे. मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी स्वतः रेल्वेने याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले असल्याचे सांगितले आहे.
रेल्वेच्या अधिकृत नोटिफिकेशन नंतर आता किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस थांबा घेणार आहेत. या निर्णयामुळे फक्त किर्लोस्करवाडीचं नाही तर तासगाव, पलूस, कडेगाव वाळवा, खानापूर, आटपाडी तालुक्यातील प्रवाशांची मोठी सोय होईल असे बोलले जात आहे.
या भागातील प्रवाशांना आता आगामी काळात पुणे बेळगाव, हुबळी, धारवाड, सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड, सातारा, घटप्रभा (गोकाक धबधबा) इत्यादी ठिकाणी जलद गतीने प्रवास करता येणार आहे. दरम्यान रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती हाती आली आहे.













