Pune Vande Bharat Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखप्राप्त आहे. दरम्यान पुण्याला आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन.
या गाडीची सुरुवात सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर झाली आणि त्यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीची सुरवात झाली. 2019 मध्ये ही गाडी पहिल्यांदा रुळावर धावली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील सहा गाड्या मुंबईवरून धावतात आणि तीन गाड्या आपल्या पुण्यावरूनही धावतात. मुंबई सेंट्रल ते सोलापूर दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे चालवली जाते. याशिवाय पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गांवर देखील वंदे ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
पुणेकरांच्या माध्यमातून या तीनही वंदे भारत गाड्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जातो. दरम्यान आता पुणेकरांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेकडून लवकरच नवी दिल्ली-पुणे या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा केला जातोय.
दिल्ली ते पुणे हे अंतर 1589 किलोमीटर इतके असून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 20 तासात पूर्ण होणार आहे. या गाडीमुळे पुणे ते दिल्ली हा प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि आरामदायी होईल अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली पाहिजे यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. दरम्यान आता आपण या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे राहू शकते आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते ? याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते दिल्ली दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेन नवी दिल्लीहून दुपारी ४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १:०० वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात, ही गाडी पुण्याहून दुपारी ३:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दिल्लीला पोहोचणार अशी माहिती समोर येत आहे. मात्र या गाडीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही यामुळे ही गाडी सुरू झाल्यानंतरच याचे वेळापत्रक नेमके कसे राहणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार
पुणे ते दिल्ली दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ, खंडवा आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय.
तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागणार आहे.