Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुमचे किंवा तुमच्या परिवारातील अथवा मित्रांचे पंजाब नॅशनल बँकेत अकाउंट असेल तर आजची ही बातमी तुमच्याच कामाची. खरेतर, बँकेने देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार केवायसी अपडेटबाबत अलर्ट जारी केला आहे.
पंजाब नॅशनल बँक ही देशातील प्रमुख सरकारी बँक असून या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. दरम्यान या बँकेने ज्या ग्राहकांची केवायसी 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार नाही, त्यांनी लवकरात लवकर म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीलाच हे काम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.

बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी केवायसी अद्यतन करणे अनिवार्य आहे, त्यामुळे बँक वेळोवेळी याबाबत ग्राहकांना मेसेज पाठवत आहे तसेच ई-मेल सुद्धा पाठवले जात आहेत.
दरम्यान जर बँक ग्राहकांनी ठरलेल्या मुदतीत केवायसी अद्यतन केले नाही तर त्यांच्या खात्याच्या व्यवहारांवर निर्बंध लागू होऊ शकतात. फक्त केवायसी केली नाही तरी या बँकेच्या ग्राहकांना पैसे जमा करणे किंवा काढणे यासह इतर व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रलंबित असलेल्या केवायसी अपडेटसाठी अंतिम मुदत 26 मार्च 2025 होती. खरेतर, बँकिंग व्यवस्थेत केवायसीला मोठे महत्त्व आहे. ग्राहकांची ओळख व पत्त्याची खातरजमा करण्यासाठी याचा उपयोग होतो.
तसेच, बँकांकडे ग्राहकांविषयी आवश्यक माहिती सुद्धा उपलब्ध राहते. यामुळे आर्थिक गुन्हे रोखण्यास मदत होते आणि फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येते. बँकेने ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
कोणत्याही अनोळखी स्रोताकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे किंवा फाईल डाउनलोड करणे टाळावे. संशयास्पद एसएमएस किंवा कॉल आल्यास त्वरित तक्रार करावी. केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करू शकतात.
पीएनबी वन, इंटरनेट बँकिंग सेवा, नोंदणीकृत ईमेल किंवा पोस्टद्वारे केवायसी अपडेटसाठी विनंती केली जाऊ शकते. तसेच, ग्राहकांना नजीकच्या पंजाब नॅशनल बँक शाखेत जाऊनही केवायसी अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या ग्राहकांनी अजून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून बँकेकडून खातेधारकांना जलद गतीने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे.