मुळा उजव्या कालव्यास १९ डिसेंबर २०२४ पासून आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतक-यांनी केली होती. याचे गांभिर्य लक्षात घेवून ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिका-यां समवेत नागपुर येथे बैठक घेतली. या बैठकीस आ.शिवाजीराव कर्डील, आ.विठ्ठलराव लंघे, आ.मोनीका राजळे, आ.काशिनाथ दाते यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यासह अन्य आधिकारी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुळा उजव्या कालव्यातून १९ डिसेंबर २०२४ रोजी लाभक्षेत्रासाठी पाणी सोडण्यात येणार असून, ३५ दिवसांचे आवर्तन निश्चित करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.
आवर्तन मिळावे अशी मागणी शेतक-यांची मोठ्या प्रमाणात होती. लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने याबाबतचा निर्णय करण्यात आला. आवर्तनाच्या बाबतीत आधिका-यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच शेवटच्या शेतक-याला पाणी मिळावे असे नियोजन करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यांना दिल्या आहेत.