नगर-दौंड रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण; १२० किमी वेगाने धावणार गाड्या

Published on -

Railway News : नगर – दौंड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण (डबल लाईन) प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दौंड ते काष्टी दरम्यानच्या सुमारे १३ किलोमीटर अंतराच्या नवीन दुहेरी मार्गाची तांत्रिक चाचणी रविवारी पार पडली.

गेल्या तीन वर्षांपासून मनमाड-नगर-दौंड या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण युद्धपातळीवर सुरू असून, मनमाड ते नगर हा पहिला टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला आहे. आता नगर ते दौंड या दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

आतापर्यंत या मार्गावर सिंगल लाईन असल्यामुळे अनेक प्रवासी आणि मालगाड्यांना क्रॉसिंगसाठी तासन्‌तास एकाच ठिकाणी थांबावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत होता आणि वाहतुकीवर मोठा ताण येत होता.

मात्र, दुहेरी मार्ग पूर्ण झाल्याने ही अडचण दूर होणार असून, गाड्यांना विनाकारण थांबे घ्यावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणही पूर्ण झाले असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि अधिक कार्यक्षम रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.

रविवारी झालेल्या तांत्रिक चाचणीत विशेष रेल्वे इंजिनच्या सहाय्याने मार्गाची क्षमता, सुरक्षितता आणि वेगाची तपासणी करण्यात आली. दुहेरीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढून तो ताशी १२० किलोमीटरपर्यंत जाणार आहे.

यामुळे नगर-दौंड तसेच मनमाड-दौंड या संपूर्ण पट्ट्यातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रवासी गाड्यांसोबतच मालवाहतुकीलाही याचा मोठा फायदा होणार असून, औद्योगिक व कृषी क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे.

ही चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी (बांधकाम), सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी यांच्यासह धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, सुधांशू कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, राकेश कुमार, परशुराम राठोड आणि धम्मरत्न संसारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने नगर-दौंड दरम्यानचे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेसेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार असल्याने प्रवासी तसेच व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News