Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहे. राज्यात अजूनही रेल्वेच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता राज्यातील मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प रेल्वेने प्रस्तावित केला असून या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे.

हा रेल्वे मार्ग 177 किलोमीटर लांबीचा आहे. यामुळे संभाजीनगर ते परभणी हा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान आता या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात राजपत्र जारी करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
तसेच यासाठी 2179 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दुहेरीकरण प्रकल्पासाठी जाहीर करण्यासाठी राजपत्रात बाधित होणाऱ्या जमीन मालकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यात प्रकल्पासाठी किती भूसंपादन करण्यात येणार, याची पण माहिती आहे.
खरंतर या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध रेल्वे प्रकल्पांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. पीएम गतिशक्तीअंतर्गत मार्च महिन्यात नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची (एनपीजी) बैठक आयोजित करण्यात आली होती.
यात देशभरातील महामार्ग, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान आणि मेट्रो अशा 11 पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचा सुद्धा समावेश झालेला होता. तेव्हापासून या प्रकल्पाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या मंत्रिमंडळीय समितीने चार महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. जुलैअखेर रेल्वे मंत्रालयाच्या 11 हजार 169 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
यात छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा पण समावेश होता. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर मराठवाड्यातील अनेक वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली. दरम्यान, आता याच दुहेरीकरण प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुद्धा वेगात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील प्रवाशांना मुंबई आणि परभणीकडील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.













