Railway News : रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. अनेकदा प्रवासी तिकीट काढूनही वेळेवर स्टेशनवर न पोहोचणे, ठरलेल्या स्थानकावरून प्रवास सुरू न करणे किंवा तिकीट असूनही ट्रेनमध्ये न बसणे अशा कारणांमुळे सीट रिकामी राहते.
परिणामी, वेटिंगवर असलेल्या प्रवाशांमध्ये जागेसाठी वाद निर्माण होतात. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

या नव्या नियमानुसार, प्रवाशाने ज्या स्थानकावरून तिकीट काढले आहे, त्याच स्थानकावरून त्याला प्रवास सुरू करणे बंधनकारक असणार आहे. जर प्रवासी त्या स्थानकावरून ट्रेनमध्ये बसला नाही, तर त्याची सीट ‘नो-शो’ मानली जाईल.
अशा परिस्थितीत ती जागा तात्काळ वेटिंग लिस्टवरील इतर पात्र प्रवाशाला देण्यात येणार आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट असूनही प्रवास न करणाऱ्या प्रवाशांमुळे होणारा गैरवापर थांबवण्याचा रेल्वेचा उद्देश आहे.
रेल्वे मंत्रालयाने ही नवीन व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रणालीद्वारे प्रवासी ठरलेल्या बोर्डिंग स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला की नाही, याची नोंद घेतली जाईल. जर प्रवासी अनुपस्थित राहिला, तर संबंधित सीट आपोआप वेटिंग प्रवाशासाठी उपलब्ध होईल आणि त्याला तात्काळ कन्फर्मेशन मिळेल.
तसेच, ज्या प्रवाशांना तिकीट काढलेल्या स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून प्रवास सुरू करायचा आहे, त्यांनी किमान 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.
ही माहिती सिस्टीममध्ये अपडेट न केल्यास, प्रवासी ठरलेल्या स्थानकावरून गैरहजर राहिल्यास त्याची सीट रिकामी मानली जाईल आणि ती इतर प्रवाशाला दिली जाईल.
या बदलाचा सर्वाधिक फायदा वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना होणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सीट्सचा अधिक प्रभावी वापर होईल. सिस्टीम अपडेट झाल्यानंतर देशभरातील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हा नियम लागू केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी नियमांची माहिती घेऊनच नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.













