प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेने सुरू केल्या विशेष गाड्या; तुमच्या शहराचा समावेश आहे का?

Published on -

Railway News : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून मुंबई-कोल्हापूर, अमरावती आणि नांदेडदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, जळगाव, शेगाव आणि अकोला मार्गावरील प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

मुंबई-कोल्हापूर-मुंबई विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविल्या असून, दि. २४ जानेवारी रोजी मुंबई येथून ही गाडी सुटली आहे. तर दि. २६ जानेवारी रोजी कोल्हापूर येथून ही गाडी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी मुंबई पोहोचेल.

या गाडीमध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन समाविष्ट आहे. गाडी दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज आणि हातकणंगले या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

याचबरोबर, मुंबई-नांदेड-मुंबई मार्गावर चार विशेष फेऱ्या वाढवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती-पनवेल-अमरावती अनारक्षित विशेष गाड्यांच्या दोन फेऱ्या देखील वाढविण्यात आल्या आहेत.

या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१४१५ दि. २६ जानेवारी रोजी पनवेल येथून सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ही गाडी कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला आणि बडनेरा या ठिकाणी थांबेल.

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या विशेष गाड्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांनी तिकीट आधीच बुक करून ठेवावे. या विशेष गाड्यांमुळे गर्दीचा ताण कमी होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर, आरामदायक व सुरळीत होईल.

प्रवाशांनी वेळेवर तिकीट बुक करणे आवश्यक असून, गर्दीच्या दिवसांत सुरक्षित व सुखद प्रवासासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe