Railway News : भुसावळ-इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या मेमू लोकल रेल्वे गाडीचा विस्तार थेट कसारापर्यंत करण्यात यावा, अशी जोरदार मागणी उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी वर्गाकडून होत आहे. सध्या भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आदी भागांतील प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागत आहे. या प्रवासात वेळेची नासाडी, अतिरिक्त खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने थेट कसारापर्यंत मेमू सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या भुसावळ-मुंबई दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य प्रवाशांना त्यामध्ये आरक्षित जागा मिळणे कठीण ठरते. परिणामी अनेक प्रवासी भुसावळ-इगतपुरी मेमूने इगतपुरीपर्यंत प्रवास करतात.

त्यानंतर इगतपुरीहून कसाऱ्यापर्यंत दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. कसाऱ्याहून पुढे मुंबईसाठी लोकल रेल्वे पकडावी लागते. गाड्या बदलण्याच्या या प्रक्रियेमुळे अनेकदा वेळेचे नियोजन कोलमडते आणि आर्थिक भारही वाढतो.
भुसावळ-इगतपुरी मेमू थेट कसारापर्यंत वाढविण्यात आल्यास उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना अनारक्षित, परवडणारी आणि सुलभ मुंबई जोडणी मिळू शकते. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कसाऱ्याहून मुंबईसाठी उपनगरीय लोकल रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने प्रवास अधिक सोपा होईल.
दरम्यान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी या मागणीवर महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इगतपुरी-कसारा दरम्यानच्या अवघड घाट विभागात मेमू गाडी चालविण्यासाठी अत्याधुनिक रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम असलेले डबे आवश्यक आहेत.
सध्या असे डबे उपलब्ध नसल्याने मेमूचा कसारापर्यंत विस्तार शक्य नाही. मात्र भविष्यात तांत्रिक सुधारणा झाल्यास या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर बडनेरा-नाशिक रोड ही संपूर्ण अनारक्षित मेमू गाडीही प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत असून तिचाही कसारापर्यंत विस्तार करण्याची मागणी होत आहे. अत्याधुनिक डबे उपलब्ध झाल्यास भुसावळ-इगतपुरीसह बडनेरा-नाशिक मेमू सेवांचा कसारापर्यंत विस्तार शक्य होईल, असा विश्वास प्रवासी वर्ग व्यक्त करीत आहे. आता या मागणीसाठी लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुरावा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













