Railway News : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ऑपरेशनल सुधारणा लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. रेल्वेने जाहीर केलेले हे नवे वेळापत्रक शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पासून लागू होणार असून, काही गाड्यांच्या वेळांमध्ये फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात बदल करण्यात येणार आहेत.
त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा रेल्वे स्थानकावर तासन्तास ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १२ गाड्यांच्या वेळापत्रकात करण्यात येणारे बदल केवळ ऑपरेशनल सुधारणा म्हणूनच नाही, तर रूळांची नियमित देखभाल, सिग्नलिंग व्यवस्थेतील सुधारणा आणि गाड्यांच्या वेळेवर धावण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी करण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ५४०२० रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन पॅसेंजर ट्रेनचा समावेश असून, या गाडीच्या वेळापत्रकात ३० जानेवारी २०२६ पासून बदल लागू होणार आहे.
त्याचप्रमाणे, ८२५०२ लखनौ जंक्शन-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेसच्या वेळेत १ फेब्रुवारी २०२६ पासून बदल होईल. २२४४९ गुवाहाटी-नवी दिल्ली एक्सप्रेसच्या वेळेत ३१ जानेवारी २०२६ पासून सुधारणा करण्यात आली आहे.
याशिवाय, सिलचर-नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि १२३४९ गोड्डा-नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या वेळा २ फेब्रुवारी २०२६ पासून बदलणार आहेत. १४६१९ आगरतळा-फिरोजपूर कॅन्ट त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसच्या नवीन वेळा ५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील.
तसेच, २२४२७ बलिया-आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि १२५८३ लखनौ जंक्शन-आनंद विहार डबल डेकर एक्सप्रेसच्या वेळेत १ फेब्रुवारीपासून बदल करण्यात आला आहे.
१५५५७ दरभंगा जंक्शन-आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेसच्या वेळा २ फेब्रुवारीपासून लागू होतील, तर ५४३२९ बालामऊ जंक्शन-शाहजहानपूर जंक्शन पॅसेंजर आणि ५४०७५ बरेली जंक्शन-दिल्ली जंक्शन पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत ३० जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहेत. १३०२० काठगोदाम–हावडा जंक्शन बाग एक्सप्रेसच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे वेबसाइट, रेल्वे अॅप किंवा स्थानकावरील चौकशी केंद्रातून अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा. यामुळे गैरसोय टाळता येईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.













