Railway Ticket Rate : केंद्र सरकार १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा करू शकते. गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची रेल्वे तिकीट सवलत तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्या काळात रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती आणि आर्थिक बोजा वाढला होता.
परिणामी, ही सवलत बंद ठेवल्यामुळे सरकारला दरवर्षी सुमारे १,६०० ते २,००० कोटी रुपयांची बचत होत होती. मात्र, आता रेल्वेची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून पुन्हा सवलत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या स्वरूपात ही सवलत लागू होऊ शकते. ५८ वर्षांवरील महिला प्रवाशांना रेल्वे तिकीटावर थेट ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ३,००० रुपयांचे तिकीट केवळ १,५०० रुपयांत मिळू शकते.
तर ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना ४० टक्के सवलत मिळण्याचे संकेत आहेत. सुरुवातीला ही सवलत स्लीपर आणि थर्ड एसी (3AC) वर्गापुरती मर्यादित ठेवण्याची शक्यता असली तरी, फर्स्ट एसी आणि सेकंड एसीसाठीही सवलत लागू करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
अंमलबजावणीच्या दृष्टीने ही प्रक्रिया सोपी ठेवली जाण्याची शक्यता आहे. सवलत मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष कार्डाची आवश्यकता भासणार नाही. पूर्वीप्रमाणेच IRCTC च्या वेबसाईटवर किंवा रेल्वे तिकीट काउंटरवर बुकिंग करताना प्रवाशाने फक्त आपले वय नमूद केल्यास सवलत आपोआप लागू होईल.
जर ही घोषणा प्रत्यक्षात आली, तर देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, सामाजिक दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.













