Railway Ticket : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठा बदल येत आहे. दररोजच्या रेल्वे प्रवासासाठी वापरलं जाणारं मोबाईल तिकीट बुकिंग ॲप ‘UTS’ १ मार्चपासून बंद होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, यापुढे केवळ RailOne हे ॲप प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग, R-Wallet रिचार्ज आणि इतर सर्व सेवा पुरवणारे एकमेव, अधिकृत आणि एकात्मिक मोबाईल प्लॅटफॉर्म असेल. रेल्वेने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, कोणताही अडथळा येऊ नये म्हणून लवकरात लवकर RailOne ॲपवर शिफ्ट व्हावं.

UTS ॲप वापरणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बाब म्हणजे, जे युजर्स नवीन व्हर्जन डाउनलोड किंवा अपडेट करतील, त्यांना UTS प्लॅटफॉर्मवर तिकीट बुक करता येणार नाही किंवा R-Wallet रिचार्ज करता येणार नाही.
मात्र रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, UTS ॲपमधील प्रवाशांची R-Wallet शिल्लक पूर्णपणे सुरक्षित राहील. ही शिल्लक RailOne ॲपवर सहजपणे वापरता येईल, ती कुठेही जाणार नाही किंवा संपणार नाही.
नवीन RailOne ॲपमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसह सर्व प्रकारची तिकिटे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.
सुरक्षित पेमेंटसाठी युपीआय (UPI), डेबिट/क्रेडिट कार्ड, R-Wallet आणि नेट बँकिंगचे पर्याय दिले गेले आहेत. तसेच, प्रवाशांना ट्रेनची लाईव्ह स्थिती, विलंब, कोचची स्थिती आणि प्लॅटफॉर्मची माहिती मिळवता येईल.
PNR स्टेटस तपासणे, तिकीट रद्द करणे, रिफंड मागवणे आणि रेलमदतद्वारे तक्रारी नोंदवण्याची सोय देखील यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर, आयआरसीटीसी मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून प्रवाशांना प्रवासादरम्यान जेवण मागवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
UTS मोबाईल तिकिटिंग प्रणालीची सुरुवात २७ डिसेंबर २०१४ रोजी झाली होती. सुरुवातीला ही सुविधा मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये सुरू झाली होती.
त्यानंतर २०१५ ते २०१७ दरम्यान चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि सिकंदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये याचा विस्तार झाला. १ नोव्हेंबर २०१८ पासून ही सुविधा इंटर-झोनल प्रवासासाठीही उपलब्ध झाली, ज्यामुळे संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये मोबाईलद्वारे तिकीट बुक करणे शक्य झाले.
रेल्वे प्रवाशांनी या बदलासाठी आता तयारी करणे आवश्यक आहे. UTS बंद झाल्यानंतर RailOne ॲपवर तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना सहज आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध राहतील, त्यामुळे प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.













