Rain Alert : महाराष्ट्रासाठी एक महत्वाचे अपडेट आहे. राज्याचे हवामान पुन्हा 360 डिग्री फिरणार आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट कायम आहे. त्याचा परिणाम आता आपल्याकडे पण जाणवत आहे.
राज्यातील काही भागांमध्ये आज किमान तापमान फारच खाली आले. पण अनेक ठिकाणी थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली!
आज थंडीची तीव्रता अचानक कमी झालीये. ढगाळ हवामानामुळे ऊबदारपणा वाढलाय. तरीही नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे किमान तापमान घटले.
येथील गहू संशोधन केंद्रात आज सकाळी किमान तापमान ७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले.
दुसरीकडे, नगर आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तसेच कोकण पट्ट्यात किमान तापमानात वाढ दिसून आली आहे.
या भागांमध्ये ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवत असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोणत्या 4 जिल्ह्यात हलका पाऊस पडणार?
धुळे
जळगाव
नाशिक
अहिल्यानगर (नगर)
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे हवामान महत्त्वाचे ठरणार असून हलक्या पावसामुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
मात्र अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडी, ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा संगम पाहायला मिळणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.













