Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून, ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने अनेक भागांत हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने नुकसान अधिक तीव्र झाले आहे.
मंगळवारी २७ जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने यापूर्वीच राज्यातील सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. सायंकाळनंतर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे १० ते १२ मिनिटे गारपीट झाली. या गारपिटीचा थाळनेर, सावेर यांसारख्या गावांना मोठा फटका बसला असून, केळी, कांदा, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज सकाळपासून राज्यातील वातावरण ढगाळ असून, पहाटे अनेक ठिकाणी दाट धुके आणि मोठ्या प्रमाणात दव पडल्याचे चित्र दिसून आले.
यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे. शेतात उभी असलेली तसेच काढणी करून ठेवलेली पिके भिजल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट ओढावले आहे.
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. हवामानातील या अनिश्चिततेमुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे.












