Rain Alert : सध्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढतांना दिसत आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अर्थातच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात सुद्धा थंडीची तीव्रता आता वाढली आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान खात्याकडून एक नवीन अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून अर्थात 26 नोव्हेंबर पासून देशातील तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्रप्रदेशच्या दक्षिणेकडील किनारी भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष सावध राहावे असे आवाहन भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील 24 तासांत ते उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता असल्याने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानात झालेल्या या बदलामुळे या सदरील भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या अनुषंगाने या संबंधित भागातील नागरिकांनी विशेष सावध राहावे असे आवाहन तज्ञांनी केले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ हवामाना अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात दरवर्षी दोन ते सात डिसेंबर दरम्यान पाऊस होत असतो आणि यंदाही एक ते चार डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नुकताच जारी केला आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी देखील पंजाबरावांचा हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे आणि शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.