Ram Shinde News : कर्जत जामखेड मधील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अन माजी मंत्री राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार अशी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामाभाऊंचा पराभव झालेला असतानाही भारतीय जनता पक्ष राम शिंदे यांना विधान परिषद सभापतीपदी बसवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरेतर, रामाभाऊ हे राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अन निकटवर्तीय नेते आहेत. यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही रामाभाऊंचे विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आले. दरम्यान विधान परिषदेची आमदारकी असतानाही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावले.
पण, निवडणुकीत रामाभाऊंना निसटता पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, आता पराभवानंतरही राम शिंदे यांना विधान परिषद सभापती पदाची लॉटरी लागणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. खरे तर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाने आता सर्व महत्त्वाची पदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपद भाजपाने आपल्याकडे घेत राहुल नार्वेकर यांना संधी दिलीय. महत्त्वाचे म्हणजे आता विधान परिषदेचे सभापती पद देखील भाजप आपल्याकडेच खेचून आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी बीजेपीने तयारी सुरू केली असून विधान परिषदेच्या सभापतीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते राम शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 2022 मध्ये जेव्हा महायुतीचे सरकार आले त्यावेळी देखील रामाभाऊंची सभापती पदासाठी चर्चा होती.
मात्र एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सभापती करावी अशी मागणी लावून धरली. यामुळे सभापती पदावरून महायुतीमध्ये धुसफूस झाली आणि शेवटी सभापतीचे पद रिक्तच राहिले. या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
132 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि यामुळे बीजेपी यावेळी सर्व महत्त्वाची पदे आपल्याकडे ठेवणार आहे. मंत्रिमंडळात देखील भारतीय जनता पक्षाचेच अधिक नेते पाहायला मिळणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी देखील महायुतीला चांगले यश मिळाले. साहजिकच या यशात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा महत्त्वाचा होता. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपा आग्रही असून भाजपाकडेच हे पद जाणार असे दिसते.
यामुळे या पदासाठी भाजपाचे राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तथापि विधान परिषदेच्या सभापतीपदावर कोण बसणार याबाबतचा निर्णय महायुती मधील तिन्ही घटक पक्षांच्या माध्यमातूनच घेतला जाणार आहे. यामुळे या महत्त्वाच्या पदावर नेमके कोण विराजमान होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.